
ठाणे, 17 जून (हिं.स.)। ठाणे शहरात कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्या असे पत्र पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकारच्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेषतः शहरातील वर्दळीच्या भागांमध्ये आणि भर दिवसा घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे हे राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक शहर असून दररोज लाखो नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक विविध कारणांसाठी शहरात वावरत असतात. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क रहावे असे महापौरांनी पत्रात नमूद केले आहे.
यासाठी शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलीस गस्त वाढविणे, प्रमुख चौक, बाजारपेठा, रेल्वे स्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष पोलीस पथके तैनात करणे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, सीसीटीव्ही यंत्रणांचे प्रभावी निरीक्षण आणि नियंत्रण वाढविणे, नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम यांसारख्या उपाययोजना राबवाव्यात तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांमार्फत परिसरनिहाय बैठका घेऊन नागरिक आणि पोलीस यांच्यातील समन्वय वाढविण्यावरही भर देण्यात यावा. नागरिकांच्या मनातील सुरक्षिततेची भावना दृढ करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती तातडीची कार्यवाही करावी, असे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर