जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी २२ जूनला
जळगाव, १७ जून (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ अंतर्गत येत्या २२ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी मतमोजणीच्या कामकाजात व्य
जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी २२ जूनला


जळगाव, १७ जून (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ अंतर्गत येत्या २२ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी मतमोजणीच्या कामकाजात व्यस्त राहणार असल्याने नागरिकांनी आपल्या निवेदनांसाठी व विविध प्रशासकीय कामांसाठी पर्यायी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी १८ मे २०२६ रोजी जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीची घोषणा केली होती. त्यानुसार २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

मतमोजणीच्या दिवशी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी आणि कर्मचारी हे मतमोजणी प्रक्रियेत गुंतलेले असतील. त्यामुळे नागरिकांच्या निवेदनांवर, विनंती अर्जांवर तसेच अडी-अडचणींशी संबंधित बाबींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी सामान्य शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

नागरिकांनी २२ जून रोजी त्यांच्या समस्या, अर्ज किंवा इतर शासकीय कामकाजासाठी सुरेश कोळी, तहसीलदार (सर्वसाधारण) यांची भेट घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हा बदल केवळ २२ जून २०२६ या एकाच दिवसासाठी लागू राहणार असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली चव्हाण यांनी केले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande