एल निनोच्या आव्हानाला जलसंधारणाची ढाल; जूनअखेर सर्व कामे पूर्ण करा : मंत्री संजय राठोड
मुंबई, 17 जून (हिं.स.) : संभाव्य एल निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जलसुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाने हाती घेतलेल्या विविध योजनांच्या कामांना गती देत सर्व प्रलंबित कामे ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्
एल निनोच्या आव्हानाला जलसंधारणाची ढाल; जूनअखेर सर्व कामे पूर्ण करा : मंत्री संजय राठोड


मुंबई, 17 जून (हिं.स.) : संभाव्य एल निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जलसुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाने हाती घेतलेल्या विविध योजनांच्या कामांना गती देत सर्व प्रलंबित कामे ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत मंत्री राठोड यांनी जलयुक्त शिवार अभियान २.०, अमृत सरोवर, माजी मालगुजारी तलावांचे बळकटीकरण, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, सहसचिव पंडित जाधव, उपसचिव मृदुला देशपांडे, अवर सचिव देवेंद्र भामरे, व्यवस्थापकीय संचालक वि. म. देवराज यांच्यासह पुणे, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर व नाशिक विभागातील अधीक्षक अभियंते उपस्थित होते. राज्यातील सर्व जिल्हा जलसंधारण अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

बैठकीत मंत्री राठोड यांनी सांगितले की, एल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत १५ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. प्रत्येक कामाचे स्वतंत्र मूल्यमापन करून त्याची परिणामकारकता तपासावी. तसेच अभियानाबाहेरील गावांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आणि भूजल पुनर्भरण क्षमता अधिक असलेल्या जलसंधारण संरचनांच्या दुरुस्तीची कामे उपलब्ध शासकीय निधीतून तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

राज्यातील जलसाठ्यांची क्षमता वाढविण्यासाठी जिल्हानिहाय गाळ काढणे, नाले खोलीकरण आणि रुंदीकरणाची देण्यात आलेली उद्दिष्टे येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच प्रशासकीय मान्यता प्राप्त सर्व अमृत सरोवरांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीबाबतही मंत्री राठोड यांनी विशेष आढावा घेतला. नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांतील ४६९ माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी ४१२ तलावांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित तलावांची कामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल विभागाला सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच तलावांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी आवश्यक कार्यवाहीही तातडीने पूर्ण करण्यास सांगितले.

राज्यातील जलसंधारणाची सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण झाल्यास पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन होऊन भूजल पातळी वाढण्यास, सिंचन क्षमता मजबूत होण्यास आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य अधिक सक्षम होईल, असा विश्वास मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande