नाशिक शहरात पाणीपुरवठ्यावर नियोजनबद्ध कपात; प्रशासनाचा विशेष कृती आराखडा जाहीर
Water supply to the city
नाशिक शहरात पाणीपुरवठ्यावर नियोजनबद्ध कपात; प्रशासनाचा विशेष कृती आराखडा जाहीर


नाशिक, 17 जून (हिं.स.) : भारतीय हवामान विभागाने यंदा अल-निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त केली असून त्याचा परिणाम पर्जन्यमानावर होऊन पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नाशिक महापालिकेने विशेष कृती आराखडा तयार करून पाणीपुरवठ्यावर नियोजनबद्ध कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार शहरात जून व जुलै 2026 या महिन्यांत प्रत्येक शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

नाशिक शहराला गंगापूर धरण समूह, दारणा धरण समूह आणि मुकणे धरणातून दररोज सरासरी 600 दशलक्ष लिटर कच्च्या पाण्याचा पुरवठा केला जातो. हे पाणी सात जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये शुद्ध करून 134 जलकुंभ व सुमारे 2502 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जाते.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार 15 ऑक्टोबर 2025 ते 14 जून 2026 या कालावधीत एकूण 6400 दशलक्ष घनफूट पाण्याच्या आरक्षणापैकी 5133.99 दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला असून 1266.01 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या दररोज सरासरी 21.13 दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होत असून उपलब्ध साठा केवळ सुमारे 60 दिवस पुरेल इतकाच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मात्र ऑगस्ट अखेरपर्यंत एकूण 78 दिवसांचा कालावधी लक्षात घेता सुमारे 18 दिवसांच्या पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी जूनमध्ये दोन शनिवार, जुलैमध्ये चार शनिवार तसेच ऑगस्ट महिन्यात दर दोन दिवसाआड पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यानुसार जून व जुलै महिन्यातील प्रत्येक शनिवारी शहरात पाणीपुरवठा बंद राहील. तसेच ऑगस्ट 2026 मध्ये 1, 4, 7, 10, 13, 16, 19, 22, 25, 28 आणि 31 तारखांना पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नागरिकांनी पाणी बचतीचे उपाय अवलंबून प्रशासनास सहकार्य करावे, तसेच नियोजित पाणी कपातीची नोंद घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande