
रत्नागिरी, 17 जून, (हिं.स.) । अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सुरू केलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी सात धडक कारवाया करून ६ लाख ७ हजार १३५ रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित प्रकरणांमध्ये स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मि. र. महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एकूण ६० अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दापोली तालुक्यातील १० आस्थापनांचा समावेश असून बेकरी, हॉटेल्स व स्वीट मार्ट्सची विशेष तपासणी करण्यात आली. दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील श्री स्टोअर्स तसेच केळसकर नाका येथील अश्पाक महमूद मनियार यांच्या पान शॉपवर छापे टाकून केसरयुक्त विमल पान मसाला, आरएमडी पान मसाला आणि इतर प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले.
मर्यादित मनुष्यबळ असूनही विभागाने ही प्रभावी कारवाई केली आहे. सध्या जिल्ह्यात केवळ चार अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत असून खेड, दापोली व मंडणगड या विस्तीर्ण भागाची जबाबदारी एका अधिकाऱ्याकडे आहे. तरीही प्रशासनाने धडक मोहिम राबवत प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असून अन्न व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी