
रत्नागिरी, 17 जून (हिं.स.) । अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी असल्याचे भासवून व्यवसायिकांची फसवणूक करण्याचे प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांनी जिल्ह्यातील व्यावसायिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
संशयास्पद व्यक्ती अधिकारी असल्याचे सांगून तपासणी करत असेल किंवा पैशांची मागणी करत असेल तर त्वरित अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा पोलिसांत तक्रार नोंदवावी, असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांत अन्न व औषध प्रशासनाने कोणतीही कारवाई न केलेल्या ठिकाणी ‘FDA अधिकारी आले होते’ अशा अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिकृत माहिती प्रसिद्ध करत नागरिक आणि व्यावसायिकांना सावध केले आहे.
तपासणी, चौकशी किंवा कायदेशीर कार्यवाहीसाठी येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकृत ओळखपत्र मागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ओळख पटल्याशिवाय कोणतीही माहिती देऊ नये किंवा आर्थिक व्यवहार करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकृत अधिकारी असे :
सहाय्यक आयुक्त (अन्न) – मिलिंद महांगडे
औषध विभाग प्रमुख – शशिकांत यादव
अन्न सुरक्षा अधिकारी – तृप्ती घरत, भाग्यश्री परदेशी, संकेत कोणेरी आणि ज्ञानेश्वर आटपाडकर
या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणी अधिकारी असल्याचे सांगून व्यवसायिकांशी संपर्क साधत असल्यास त्याबाबत त्वरित प्रशासन किंवा जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी