ठाणे - शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
ठाणे, 17 जून (हिं.स.)। ठाणे जिल्ह्यामध्ये यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे शेतकरी बांधवांना खरीप पेरणी करण्यास विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत जिल्ह्यात किमान १०० मिलिमीटर पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकरी बांधवांनी पिकांची पेरणी करू नये,
ठाणे - शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन


ठाणे, 17 जून (हिं.स.)। ठाणे जिल्ह्यामध्ये यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे शेतकरी बांधवांना खरीप पेरणी करण्यास विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत जिल्ह्यात किमान १०० मिलिमीटर पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकरी बांधवांनी पिकांची पेरणी करू नये, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

हवामानातील बदलांचा विचार करून शेतकऱ्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या हवामान आधारित कृषी सल्ल्यांचा आवर्जून अवलंब करावा, अशी विनंतीही कृषी विभागाने केली आहे.

पावसाच्या उशिरा आगमनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी विभागाने आपत्कालीन पीक नियोजनाची तयारी केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी चटई पद्धतीने रोपवाटिका तयार करून भात लावणी करावी किंवा रहू पद्धतीने भाताची पेरणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच या काळात कर्जत-३, रत्नागिरी-५ या हळव्या वाणांचा आणि कर्जत-५ या निमगरव्या वाणाचा वापर करण्यावर भर द्यावा. भात रोपवाटिका अवस्थेत असताना, म्हणजेच रोपे १५ ते २० दिवसांची असताना जर पावसाने खंड दिला, तर रोपांना पाण्याचा ताण सहन करता यावा यासाठी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी १ टक्के युरियाची फवारणी करावी. तसेच नदी, नाले आणि विहीर यांसारख्या उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतांचा वापर करून रोपांना संरक्षित पाणी द्यावे व तण नियंत्रण करावे. भात लावणीच्या वेळी पावसाचा खंड पडल्यास पुनर्लागवड करताना एका ठिकाणी ५ ते ६ रोपे लावावीत आणि रोपवाटिकेस नियमित पाणी द्यावे. पीक वाढीच्या अवस्थेत पाऊस गायब झाल्यास तण नियंत्रण, कोळपणी आणि पीक संरक्षणाचे उपाय करून पिकाला संरक्षित पाणी देणे आवश्यक आहे.

भात पेरणीला होणारा विलंब लक्षात घेता, कृषी विभागाकडून सध्या क्षेत्रीय स्तरावर टोकण पद्धतीने भात लागवड आणि 'एसआरटी' (SRT) पद्धतीने गादी वाफ्यावर भात लागवड करण्याबाबत विशेष प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे. शेतकऱ्यांना मदत म्हणून टोकण पद्धतीने भात लागवडीसाठी जिल्हा परिषद सेस अनुदानातून ५०० टोकण यंत्रांचा पुरवठा करण्यात येणार आहे. चालू खरीप हंगामाच्या अनुषंगाने तंत्रज्ञान प्रसारावर भर देण्यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ९०३ मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये 'एल निनो' जनजागृती मोहिमेअंतर्गत महाकृषी पोर्टलनुसार आज अखेर ४६० मोहिमा, तर टंचाईच्या परिस्थितीत फळबागा वाचविण्यासाठी ११४ मोहिमा घेण्यात आल्या असून, या माध्यमातून जैविक आच्छादनाचा वापर आणि संरक्षित सिंचन या बाबींवर विशेष भर दिला जात आहे.

राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान आणि पौष्टिक तृणधान्य उपअभियानांतर्गत जिल्ह्यातील ३८० हेक्टर क्षेत्रावरील पीक प्रात्यक्षिकांसाठी महाबीज यंत्रणेमार्फत १९ क्विंटल दापोली-३, फुले कासारी व एकविजय (CFMV-३) या नाचणी पिकाच्या वाणांचे बियाणे पुरविण्यात आले आहे. या मोहिमेत नागली व वरई पिकांसाठी उताराला आडवी नांगरणी व पेरणी करणे आणि भाताची गादी वाफ्यावर पेरणी करणे या गोष्टींना प्रोत्साहन दिले जात आहे. यासोबतच, पीक विविधीकरणांतर्गत नागली पीक प्रात्यक्षिके आणि बांधावर तूर लागवडीसाठी ७ क्विंटल तूर बियाणे (गोदावरी वाण) वितरित करण्यात आले आहे. तसेच २५० तूर मिनीकीट अंतर्गत १० क्विंटल आणि जिल्हा परिषद सेस अनुदानामधून १६ क्विंटल गोदावरी वाणाचे तूर बियाणे पुरविण्यात आले आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने विविध मोहिमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यावर कृषी विभाग विशेष लक्ष केंद्रित करत असून, हवामानाचा अंदाज घेऊनच पुढील पावले उचलण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande