
मुंबई, 17 जून (हिं.स.) -
लोकशाही ही केवळ निवडणुका जिंकण्याचे साधन नसून जनतेने दिलेला विश्वास आणि संविधानाने दिलेली जबाबदारी आहे. पण आज देशात जे चित्र दिसत आहे, ते अत्यंत चिंताजनक आहे. विरोधी पक्षातील नेते फोडा, पक्ष फोडा, निवडून आलेले खासदार-आमदार फोडा आणि तेही पुरेसे वाटले नाही तर लोकशाही संस्थांवर दबाव आणून राजकीय फायद्याचे निर्णय राबवा, हीच भाजपची कार्यपद्धती बनली आहे, अशी प्रतिक्रिया काॅंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नावावर, भाजपविरोधी भूमिका घेऊन जनतेकडून मते मागितली गेली. पण आज या विरोधात जाऊन खासदार भाजपच्या गोटात जात असतील, तर हा केवळ राजकीय निर्णय नसून मतदारांशी केलेला विश्वासघात आहे.
जनतेने दिलेला कौल आणि पक्षनिष्ठा यांना सत्तेच्या मोहासाठी तिलांजली देणाऱ्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही. जनतेनेही आता जागृत राहून अशा लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारले पाहिजेत. तुमची निष्ठा मतदारांशी आहे की सत्तेशी? तुमची बांधिलकी विचारांशी आहे की पदांशी? याचे उत्तर या खासदारांना जनतेसमोर द्यावेच लागेल!
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी