खेड तालुक्यात आगीत होरपळून २५ जनावरांचा मृत्यू
रत्नागिरी, 18 जून (हिं.स.) । रजवेल (ता. खेड) येथे आज पहाटे लागलेल्या आगीत २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. गावातील पशुपालक मेहमूद दाऊद हमदुले यांच्या गुरांच्या वाड्याला लागलेल्या आगीत तब्बल २५ जनावरे होरपळून मृत्युमुखी पडली, तर दोन म्हशींना वाचवि
गुरांच्या गोठ्याला लागलेली आग


रत्नागिरी, 18 जून (हिं.स.) । रजवेल (ता. खेड) येथे आज पहाटे लागलेल्या आगीत २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला.

गावातील पशुपालक मेहमूद दाऊद हमदुले यांच्या गुरांच्या वाड्याला लागलेल्या आगीत तब्बल २५ जनावरे होरपळून मृत्युमुखी पडली, तर दोन म्हशींना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेमुळे पशुपालक कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गुरांच्या वाड्यात अचानक आग लागली. धुराचे लोट दिसताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र गोठ्यात साठवून ठेवलेले गवत, कडबा आणि अन्य ज्वलनशील साहित्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे संपूर्ण वाडा आगीच्या विळख्यात सापडला.

आगीचा वेग इतका प्रचंड होता की गोठ्यातील जनावरांना बाहेर काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकला नाही. या दुर्घटनेत १७ दुभत्या म्हशी, १ गाय आणि ७ वासरे अशा एकूण २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. ग्रामस्थांच्या आणि बचाव पथकाच्या प्रयत्नांमुळे दोन म्हशींना सुरक्षित बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले.

घटनेची माहिती मिळताच खेड पालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव तसेच सहायक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ आणि प्रणव घाग यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग शेजारील घरे आणि परिसरात पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी मेहमूद हमदुले व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. शासनाकडून नुकसानग्रस्त कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

खेडचे पोलीस निरीक्षक विवेक आयरे, तहसीलदार सुधीर सोनवणे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीमभाई सहिबोल, भाजपा शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, भाजपा जिल्हा सरचिटणीस वैजेश सागवेकर, मनोज दांडेकर, करण वैभव खेडेकर, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शॉर्टसर्किट, विद्युत बिघाड किंवा अन्य कारणांमुळे ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande