
बीड, 18 जून (हिं.स.)। परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र असून दरवर्षी लाखो शिवभक्त प्रभु वैद्यनाथांच्या दर्शनासाठी येथे येत असतात. देशभरातून वैद्यनाथ नगरी मध्ये येणाऱ्या भाविक शिवभक्तांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत माजी मंत्री तथा लोकप्रिय आमदार धनंजयजी मुंडे साहेब आणि ना. पंकजाताई मुंडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांचा निधी नगर परिषदेला प्राप्त झाला आहे. मात्र विविध कारणांमुळे या योजनेतील काही महत्त्वाची विकासकामे अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिली.त्यामध्ये पोलीस स्टेशनजवळ उभारण्यात आलेले तब्बल ८४ खोल्यांचे सुसज्ज भक्तनिवास हे देखील धूळखात पडले होते. परिणामी, परळीत दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना खासगी लॉज आणि भक्तनिवासांमध्ये मोठा खर्च करून राहावे लागत होते.
ही बाब माजी मंत्री आ. धनंजयजी मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेत संबंधित कंत्राटदारास उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करून भक्तनिवास वैद्यनाथ देवस्थान समितीच्या ताब्यात देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
वैजनाथ देवस्थान समितीचे विश्वस्त राजेश मालक देशमुख,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव धर्माधिकारी,गटनेते वैजनाथराव सोळंके, नगर अभियंता ज्ञानेश्वर ढवळे तसेच तीर्थक्षेत्र विकास योजनेचे कंत्राटदार जे.के. कन्स्ट्रक्शनचे संचालक जाफर खान यांनी संयुक्तपणे भक्तनिवासाची पाहणी करून श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी हे भक्तनिवास देवस्थान समितीच्या ताब्यात देण्यासाठी आवश्यक नियोजन निश्चित केले.
यावेळी कंत्राटदार जाफर खान यांनी देखील श्रावण महिन्यापूर्वी भक्तनिवासाचे सर्व उर्वरित काम पूर्ण करण्याचे अभिवचन दिले.
हे भक्तनिवास सुरू झाल्यानंतर परळीमध्ये येणाऱ्या शिवभक्त आणि भाविकांना अत्यंत माफक दरात निवासाची सुविधा उपलब्ध होणार असून तीर्थक्षेत्राच्या विकासात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis