
सिंहस्थ काळात रामकुंड परिसरातील गर्दीवर नियंत्रण होणार शक्य - आ.हिरे
नाशिक, 18 जून (हिं.स.)। सोमेश्वर धबधबा ( बालाजी मंदिर )आणि आनंदवली परिसरात सुरू असलेल्या गोदाघाट उभारणीच्या कामाची आज आ. सीमा हिरे यांनी पाहणी केली. सिहस्थ आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असून काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी अंदाज हिरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नव्याने उभारण्यात येणाऱ्या वरील ठिकाणच्या गोदाघाटामुळे सिंहस्थ काळात रामकुंड परिसरात होणारी जीवघेणी गर्दी कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास आ.हिरेंनी व्यक्त केला आहे.
सोमेश्वर धबधबा आणि आनंदवली या ठिकाणी रोज शेकडो भाविक येत असतात.पावसाळ्यात तर येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या हजारोंच्या घरात जाते.अनंत चर्तुथी तसेच इतर धार्मिक उत्सवांच्या दिवशी नवशा गणपतीला भाविकांची लक्षणीय गर्दी होत असते.आमदार सीमा हिरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या वरील दोन्ही ठिकाणी गोदाघाट उभारणीचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून काही महिन्यांपासून सुरू आहे.सदर कामाच्या प्रगतीची पाहणी आज आ.हिरेंनी केली.
महामंडळाचे कार्यकारी अभियंता विनयकुमार कोळी यांनी गोदाघाटाच्या कामा विषयीची सविस्तर माहिती आ.हिरेंना दिली.सिंहस्थ काळात रामकुंड परिसरातील भाविकांची होणारी जीवघेणी गर्दी कमी करण्यासाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या सोमेश्वर धबधबा आणि आनंदवली या ठिकाणच्या गोदाघाटाची मोठी मदत होणार असल्याने सदरचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी आमदार हिरे यांनी दिल्या आहेत.यावेळी कार्यकारी अभियंता कोळी,वेदांत उपाध्ये,प्रविण कजारिया,भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष प्रविण पाटील,फोरट्रेस एजन्सीचे विकास मांडे,अमोल शिंदे,लोकेश पाटील आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV