
लातूर, 18 जून (हिं.स.)।
औसा तालुक्यातील शिवली मोड येथे गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून औसा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवली मोड येथे काही काम सुरू असताना दोन व्यक्तींमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर हा वाद विकोपाला गेला. त्यावेळी आरोपीने रागाच्या भरात संबंधित कामगाराच्या डोक्यावर जोरदार हाताने मारल्याचे सांगितले जात आहे.
या मारामुळे कामगार खाली कोसळला. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने औसा पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी औसा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास औसा पोलीस करत आहेत.
दरम्यान, किरकोळ वादातून एका कामगाराचा जीव गेल्याने शिवली मोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis