
पुणे, 18 जून (हिं.स.)। बोगस डॉक्टरांविरुद्ध प्रभावी लढा उभारण्यासाठी महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेतर्फे ‘डीजी-केवायडी’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी डॉक्टरांना क्यूआर कोडयुक्त ‘डायनॅमिक प्लेट्स’ देण्यात येत असून, त्या क्लिनिकच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या क्यूआर कोडचे स्कॅनिंग करून रुग्ण, नागरिक तसेच तपासणी अधिकारी संबंधित डॉक्टरांची नोंदणी, शैक्षणिक पात्रता आणि परवान्याची वैधता तपासू शकणार आहेत. राज्यातील सुमारे ९० हजार नोंदणीकृत होमिओपॅथी डॉक्टरांचा या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे.
संचालक (आयुष) डॉ. रमण घुंगराळेकर यांनी या उपक्रमाला बोगस डॉक्टरांविरोधातील प्रभावी हत्यार असे संबोधले. डॉक्टरांचा सल्ला घेण्यापूर्वी नागरिकांनी क्यूआर कोड स्कॅन करून खातरजमा करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ. बाहुबली शाह यांनी सांगितले की, या व्यवस्थेमुळे नागरिकांना डॉक्टरांची माहिती सहज पडताळता येणार असून उपचार घेण्यापूर्वी संबंधित डॉक्टर अधिकृत आहेत की नाही, याची खात्री करता येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु