
अमरावती, 18 जून, (हिं.स.)। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी दर्यापूर तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी प्राथमिक आरोग्यकेंद्र, ग्रामपंचायती, पंचायत समिती तसेच विविध विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. दौऱ्याची सुरवात प्राथमिक आरोग्यकेंद्र, येवदा येथील भेटीने झाली. केंद्र परिसरातील अस्वच्छता पाहून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना खडसावले. तसेच पुढील दौऱ्याच्या वेळी अशी स्थिती दिसता कामा नये, असे निर्देश तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षकांना दिले.
यावेळी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पडताळणी करण्यात आली. संभाव्य मॉन्सून परिस्थिती लक्षात घेऊन पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. रुग्णांसाठी उपलब्ध बेडशीट, उशा व ब्लँकेटची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या स्वच्छतेबाबत समाधानकारक व्यवस्था राखण्यास सांगितले. ऑपरेशन थिएटर, प्रसाधनगृहे व इतर आरोग्य सुविधांची पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्याची सूचना त्यांनी दिली. त्यानंतर पंचायत समिती दर्यापूर येथे आयोजित आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रलंबित घरे तातडीने पूर्ण करणे, टप्पा-एक व टप्पा-दोनमधील घरकुले पूर्ण करणे, एफटीओ एका आठवड्यात पूर्ण करणे तसेच लाभार्थ्यांचे हप्ते कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित ठेवू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेताना घरकुलांची मस्टर त्वरित काढणे, सर्व पंचनामे पाच दिवसांत पूर्ण करणे, आधार सीडिंगसाठी विशेष शिबिरे घेऊन पंधरा दिवसांत काम पूर्ण करणे तसेच कोणतीही बिले प्रलंबित ठेवू नयेत, असे निर्देश देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी