अमरावतीत काँग्रेसच्या 'व्हिप'चे वाजले 12; दिग्गज नेत्यांच्या नाकाखाली नगरसेवकांनी असा धुडकावला आदेश
अमरावती, 18 जून (हिं.स.) अमरावतीमध्ये काँग्रेसच्या एकूण 16 नगरसेवकांपैकी तब्बल 6 नगरसेवकांनी पक्षाचा आदेश धाब्यावर बसवून थेट मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये धीरज हिवसे, जयश्री जठाले, कुबना तनवीर, अप्सर जहा सादीक शाह, विकी वानखडे आणि प्रशांत महाले या
अमरावतीत काँग्रेसच्या 'व्हिप'चे वाजले 12; दिग्गज नेत्यांच्या नाकाखाली नगरसेवकांनी असा धुडकावला आदेश


अमरावती, 18 जून (हिं.स.)

अमरावतीमध्ये काँग्रेसच्या एकूण 16 नगरसेवकांपैकी तब्बल 6 नगरसेवकांनी पक्षाचा आदेश धाब्यावर बसवून थेट मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये धीरज हिवसे, जयश्री जठाले, कुबना तनवीर, अप्सर जहा सादीक शाह, विकी वानखडे आणि प्रशांत महाले या नगरसेवकांचा समावेश आहे. या सर्व नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन मतदान केल्याने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे.काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या होम टाऊनमध्येच काँग्रेसला हा सर्वात मोठा धक्का बसला आहे. तिवसा नगरपंचायतीमध्ये काँग्रेसच्या एकूण 14 नगरसेवकांपैकी 3 नगरसेवकांनी थेट बंडखोरी करत मतदान केले, तर उर्वरित 11 नगरसेवक तटस्थ राहिले. तिक्यामध्ये पक्षादेश धुडकावून मतदान करणा-यांमध्ये वॉर्ड क्रमांक 8 मधील सीमा खाकसे, स्वीकृत नगरसेवक सचिन बोरे आणि वॉर्ड क्रमांक 12 मधील संगीता राऊत यांचा समावेश आहे.अमरावती विधान परिषद निवडणूक सुरुवातीपासूनच एकतर्फी मानली जात होती. भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्या बाजूने ही निवडणूक झुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. काँग्रेसकडून हर्षजीत देशमुख हे उमेदवार रिंगणात आहेत, तर वंचित बहुजन आघाडीकडून निलेश विश्वकर्मा मैदानाव आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे मतदानाच्या अंतिम क्षणापर्यंत काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख अमरावतीत फिरकलेच नाहीत, ज्यामुळे स्थानिक पातळीवर मोठा गोंधळ उडाला आणि नगरसेवकांनी थेट क्रॉस व्होटिंग केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande