
बीड, 18 जून (हिं.स.) : दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांनी बुधवारी परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे आणि ना. पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैजनाथ नगर परिषदेच्या वतीने विविध विकासकामे व रेल्वे सुविधांसंदर्भातील महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
नगर परिषदेने सादर केलेल्या निवेदनात परळी–मुंबई रेल्वे सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्थानकासाठी स्वतंत्र पिट लाईन उभारण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
याशिवाय भगवानबाबा चौक परिसरात अंडरपास तसेच जालालपूर येथे उड्डाणपूल मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली. श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक परळीत येत असल्याने त्यांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानक परिसरात अत्याधुनिक ‘पिलग्रिम सेंटर’ उभारण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.
परळी हे धार्मिक, सामाजिक आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असून रेल्वे सुविधांचा विस्तार ही काळाची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या प्रवास सुलभतेसाठी आणि भाविकांच्या सुविधांसाठी या मागण्या तातडीने मंजूर करण्यात याव्यात, अशी आग्रही भूमिका नगर परिषदेच्या वतीने मांडण्यात आली.
यावेळी नगर परिषद पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, परळी रेल्वे विकास समितीचे पदाधिकारी, रेल्वे अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis