
अमरावती, 18 जून (हिं.स.)।
वरिष्ठ पातळीवरून सातत्याने दिवसभरात विविध प्रकारची माहिती शालेय शिक्षकांकडून मागविली जाते. त्यामुळे शिक्षकांना अध्ययन करण्यास वेळ मिळत नसल्याच्या तक्रारी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने होत आहेत. शिक्षकांना शैक्षणिक कार्यापेक्षा अशैक्षणिक कामेच अधिक करावी लागत असल्याची ओरड सर्व स्तरातून होत असली तरी याकडे फारसे कुणीच लक्ष देत नसल्याने शिक्षक हैराण झाले होते. या साऱ्या बाबींचा विचार करून शासनाने आता 'माहितीचा वार शनिवार' ठेवण्याचे निश्चित केल्याने शिक्षकांना मोठाच दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे वरिष्ठ पातळीवरून शालेय स्तरावर मागितलेली ऑनलाइन / ऑफलाइन माहिती दररोज द्यावी लागणार नसून ही माहिती आठवड्यातून एकदाच शनिवारी देण्याचे स्पष्ट आदेश राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
निर्णय अत्यंत स्वागतार्ह
येणारी ऑनलाईन व ऑफलाईन माहिती दर शनिवारी सादर करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे शिक्षकांना वारंवार माहिती संकलन व सादरीकरणाच्या कामातून दिलासा मिळणार आहे. परिणामी त्यांचा अधिक वेळ अध्यापन, विद्यार्थ्यांशी संवाद आणि गुणवत्तावाढीच्या उपक्रमांसाठी उपलब्ध होईल.
- राजेश सावरकर,राज्य प्रसिध्दी प्रमुख,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी