
लातूर, 18 जून (हिं.स.) : आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या ११ विद्यार्थ्यांना दिशा प्रतिष्ठान, लातूरच्या वतीने शैक्षणिक प्रवेश शुल्कासाठी एकूण ₹1,98,831 इतके आर्थिक सहाय्य धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आले.
‘एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये’ या उद्देशाने दिशा प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक बळ मिळावे आणि त्यांची शैक्षणिक वाटचाल खंडित होऊ नये, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत शिवानी पांडुरंग बोयने, गिरी श्रुती गजेंद्र, अंकिता दिनकर बिरादार, हणमंत नामदेव टिंगरे, मधुरा केशवराज रायवाडे, हणुमंत माधवराव निरगुडे, परमेश्वर रामेश्वर भारती, वैष्णवी ओमप्रकाश हिरे, मधुमती मारुती पाटील, साईनाथ सिद्राम ढमाले, स्नेहा भालकीकर आणि निकिता नितीन शेळकीकर या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य देण्यात आले.
हा कार्यक्रम लातूर येथील क्रीडा संकुलातील दिशा प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक डॉ. चेतन सारडा होते.
या प्रसंगी रेणा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, दिशा प्रतिष्ठानचे ज्येष्ठ संचालक रतन बिदादा, क्रेडाईचे अध्यक्ष उदय पाटील तसेच बाभळगावचे माजी उपसरपंच अविनाश देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांचा संस्थेच्या वतीने वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले यांनी संस्थेच्या आरोग्य व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. यशवंतराव पाटील यांनी दिशा प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले. उदय पाटील यांनी संस्थेने राबविलेल्या आरोग्य शिबिरांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इसरार सगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन रतन बिदादा यांनी केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, लाभार्थी विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis