गडचिरोलीला ‘ग्रीन स्टील हब’ बनवण्याचा राज्याचा प्रस्ताव; सहा लोहखनिज खाणींसाठी मागणी
गडचिरोली, 18 जून (हिं.स.) : महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला देण्यात याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा व खनिकर्
मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्रीय मंत्री जी .किशन रेड्डी सोबत बैठक


गडचिरोली, 18 जून (हिं.स.) : महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला देण्यात याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या खाणी राज्य महामंडळाकडे दिल्यास त्या पुढील दोन ते चार वर्षांत कार्यान्वित करून 2030 पर्यंत मोठ्या प्रमाणात लोहखनिज उत्पादन सुरू करता येईल. यामुळे महाराष्ट्र स्टील उत्पादन व निर्यात क्षेत्रात आघाडीवर जाऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत केंद्रीय खाण व ऊर्जा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी गडचिरोलीतील उच्च दर्जाच्या लोहखनिज साठ्यांचा औद्योगिक विकासासाठी मोठा उपयोग होऊ शकतो, असेही नमूद करण्यात आले.

सरकारच्या मते, गडचिरोली परिसरात लोहखनिजाबरोबरच चुनखडी आणि कोळसा यांसारखी खनिजे उपलब्ध असल्याने हा भाग पोलाद उद्योगासाठी अत्यंत अनुकूल आहे. तसेच नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्याने औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील स्टील उद्योगांसाठी टाटा आणि जेएसडब्ल्यू यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी करार केले असून, सुमारे 3 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून लाखो रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात 40 हून अधिक खनिज ब्लॉक्स लिलावासाठी तयार आहेत. गडचिरोलीतील या खाणी राज्य महामंडळाला मिळाल्यास खनिज उत्पादन अधिक जलद आणि पारदर्शक पद्धतीने होईल.

या प्रकल्पामुळे 2030 पर्यंत सुमारे 50 दशलक्ष टन लोहखनिज उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, महाराष्ट्र देशातील प्रमुख स्टील उत्पादन केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande