गडचिरोलीतील 4 उपसा सिंचन योजनांना मंजुरी; 48 गावांतील 9,573 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
- एकूण 722.95 कोटी रुपयांच्या प्रकल्पांमुळे हजारो शेतकऱ्यांना लाभ - डॉ. अशोक नेते यांची पत्रकार परिषदेत माहिती गडचिरोली, 18 जून (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यातील पाण्याअभावी त्रस्त, आदिवासी, दुर्गम आणि अनेक वर्षांपासून सिंचन सुविधांपासून वंचित असल
पत्रपरिषदेत माहिती देतांना माजी खा. नेते


- एकूण 722.95 कोटी रुपयांच्या प्रकल्पांमुळे हजारो शेतकऱ्यांना लाभ

- डॉ. अशोक नेते यांची पत्रकार परिषदेत माहिती

गडचिरोली, 18 जून (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यातील पाण्याअभावी त्रस्त, आदिवासी, दुर्गम आणि अनेक वर्षांपासून सिंचन सुविधांपासून वंचित असलेल्या शेतकरी बांधवांच्या जीवनात आर्थिक समृद्धीचा नवा अध्याय निर्माण व्हावा, शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने राज्य शासनाने 4 महत्त्वपूर्ण उपसा सिंचन योजनांना मंजुरी दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला असून, यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती माजी खासदार तथा भारतीय जनता पक्ष अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी गडचिरोली येथील आपल्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

डॉ. नेते यांनी सांगितले की, गडचिरोली हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील आदिवासीबहुल आणि दुर्गम जिल्हा असून, सिंचन सुविधांच्या अभावामुळे येथील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा मिळावा, शेती उत्पादनात वाढ व्हावी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळावे या उद्देशाने त्यांनी 18 मे 2026 रोजी मुख्यमंत्री कार्यालय, जलसंपदा विभाग आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे चारही उपसा सिंचन प्रकल्पांबाबत सविस्तर निवेदन सादर करून सातत्याने पाठपुरावा केला होता.

या अथक प्रयत्नांना आणि राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेला यश मिळत चार महत्त्वपूर्ण योजनांना मंजुरी प्राप्त झाली आहे.

मंजूर योजनांचा समावेश

मंजूर करण्यात आलेल्या योजनांमध्ये पुढील उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे :

सिरोंचा तालुक्यातील रंगायपल्ली उपसा सिंचन योजना

सिरोंचा तालुक्यातील रमेशगुडम उपसा सिंचन योजना

मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम उपसा सिंचन योजना

चामोर्शी तालुक्यातील राजीव-चिंचोड उपसा सिंचन योजना

48 गावांना लाभ; 9,573 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

या योजनांमुळे :

रंगायपल्ली उपसा सिंचन योजनेचा लाभ 14 गावांना

रमेशगुडम उपसा सिंचन योजनेचा लाभ 5 गावांना

राजीव-चिंचोड उपसा सिंचन योजनेचा लाभ 14 गावांना

शांतीग्राम उपसा सिंचन योजनेचा लाभ 15 गावांना

मिळणार आहे

एकूण 48 गावांतील सुमारे 9,573 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

सुमारे 722.95 कोटी रुपये खर्चाच्या या चार महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे हजारो शेतकरी कुटुंबांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार

यावेळी डॉ. नेते यांनी सांगितले की, या योजनांच्या मंजुरीसाठी विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांची गंभीर दखल घेत तातडीने सकारात्मक निर्णय घेतला. त्याबद्दल गडचिरोली जिल्ह्यातील समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि त्यांचे अभिनंदन केले.

तसेच भविष्यातही गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, शेती व सिंचन क्षेत्राच्या बळकटीसाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आपले प्रयत्न अविरत सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषी विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

गडचिरोलीच्या कृषी क्षेत्रात नवे पर्व सुरू करणारा, सिंचनाचा विस्तार घडवून आणणारा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस चालना देणारा हा निर्णय जिल्ह्याच्या विकासाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, समन्वयक प्रमोद पिपरे, नगरपरिषद बांधकाम सभापती तथा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, गोवर्धन चव्हाण, डॉ. भारत खटी, सुधाकर पेटकर तसेच भारतीय जनता पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande