पाऊस लांबल्याने पुण्यात पाणीटंचाई तीव्र; दिवसाआड पाणीपुरवठा सुरू
पुणे, 18 जून (हिं.स.)। जून महिना अर्धा संपत आला असला, तरी पावसाने अद्याप दमदार हजेरी लावलेली नाही. परिणामी, खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून पुणे महानगरपालिकेने शहरात पाणीकपात लागू केली आहे. सम आणि विषम तारखांनुसार नवीन पाणीप
water


पुणे, 18 जून (हिं.स.)।

जून महिना अर्धा संपत आला असला, तरी पावसाने अद्याप दमदार हजेरी लावलेली नाही. परिणामी, खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून पुणे महानगरपालिकेने शहरात पाणीकपात लागू केली आहे. सम आणि विषम तारखांनुसार नवीन पाणीपुरवठा वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

शहर आणि उपनगरांतील विविध भागांमध्ये कुठे कमी दाबाने तर कुठे अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाण्यासंदर्भात ‘कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

उन्हाळ्याची तीव्रता आणि पावसाळा लांबल्यामुळे पाणीटंचाई अधिक गंभीर बनली आहे. प्रशासनाने दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे स्पष्ट केले असले, तरी अनेक भागांतील नागरिक अस्वस्थ आहेत.

धनकवडी आणि आंबेगाव पठार परिसर उंच भागात असल्याने तेथे कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. आंबेगाव पठारमधील सोळा नंबर आणि भिंताडेनगर परिसर महानगरपालिकेत समाविष्ट होऊनही तेथील नागरिकांना अजूनही टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी दररोज किमान एक तास ठराविक वेळेत पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. धनकवडी परिसरातही नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande