जळगावात विधान परिषदेसाठी ९७.७८ टक्के विक्रमी मतदान
जळगाव, 18 जून (हिं.स.)जळगाव विधान परिषद निवडणुकीतील एका जागेसाठी आज गुरुवारी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील एकूण 630 मतदारांपैकी 616 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत 97.78 टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली. मात्
जळगावात विधान परिषदेसाठी ९७.७८ टक्के विक्रमी मतदान


जळगाव, 18 जून (हिं.स.)जळगाव विधान परिषद निवडणुकीतील एका जागेसाठी आज गुरुवारी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील एकूण 630 मतदारांपैकी 616 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत 97.78 टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली. मात्र, चाळीसगावमध्ये नगरसेवकांनी जाहीर केलेल्या बहिष्कारामुळे तेथील मतदानाची टक्केवारी जिल्ह्यात सर्वात कमी राहिली.सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत झालेल्या मतदानात ६३० पैकी ६१६ मतदारांनी मतदान केले, तर १४ मतदार विविध कारणांमुळे मतदान प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत. पुरुष मतदारांमध्ये ३१५ पैकी ३०९ जणांनी मतदान करून ९८.१० टक्के, तर महिला मतदारांमध्ये ३१५ पैकी ३०७ जणींनी मतदान करून ९७.४६ टक्के मतदानाची नोंद झाली.जिल्ह्यातील अमळनेर, फैजपूर, जळगाव, एरंडोल आणि पाचोरा या मतदान केंद्रांवर 100 टक्के मतदान झाले. तर भुसावळ केंद्रात ११८ पैकी ११६ मतदारांनी मतदान केल्याने तेथे ९८.३१ टक्के मतदानाची नोंद झाली.चाळीसगाव मतदान केंद्रात मात्र केवळ ७०.७३ टक्के मतदान झाले. येथे ४१ मतदारांपैकी फक्त २९ जणांनी मतदान केले, तर १२ मतदारांनी मतदानापासून दूर राहणे पसंत केले. भाजप उमेदवाराविरोधातील नाराजी व्यक्त करत शहर विकास आघाडीच्या ११ नगरसेवकांसह दोन अपक्ष नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.चाळीसगाव वगळता जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर जवळपास शंभर टक्के मतदान झाल्याने निवडणूक चुरशीची झाल्याचे चित्र दिसून आले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून आता मतपेटीत बंद झालेल्या मतांमधून विजयाचा गुलाल कोण उधळणार, याकडे जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande