ज्येष्ठ पत्रकार विराग पाचपोर कालवश
नागपूर, 18 जून (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, ज्येष्ठ पत्रकार व लेखक आणि ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’ चे राष्ट्रीय संयोजक विराग पाचपोर यांचे गुरुवार, 18 जून रोजी नागपूर येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात प
दिवंगत विराग पाचपोर


नागपूर, 18 जून (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, ज्येष्ठ पत्रकार व लेखक आणि ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’ चे राष्ट्रीय संयोजक विराग पाचपोर यांचे गुरुवार, 18 जून रोजी नागपूर येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा, मुलगी राधिका आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या, शुक्रवार 19 जून रोजी सकाळी ९ वाजता सहकार नगर घाट येथे अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मूळचे नागपूरकर असलेल्या पाचपोर यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, विवेकानंद केंद्राचे सेवाव्रती म्हणून सलग 14 वर्षे ईशान्य भारतात, प्रामुख्याने अरुणाचल प्रदेश येथे सेवाकार्य केले. ईशान्य भारतात कामाची गरज म्हणून त्यांनी ‘दी सेंटिनल’ या इंग्रजी वृत्तपत्रातून आपल्या लेखनाला सुरुवात केली होती. नागपूरला परतल्यानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आणि नागपूर ‘तरुण भारत’ तसेच ‘हितवाद’ या दैनिकांमध्ये पत्रकारिता केली.तसेच सुमारे 20 वर्षे नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागात अतिथी व्याख्याता म्हणूनही त्यांनी काम पाहिले, तर 2010 ते 2020 या काळात त्यांनी ‘न्यूज भारती डॉट कॉम’ या न्यूज पोर्टलचे संपादक म्हणून त्यांनी धुरा सांभाळली.

इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. भारतीय चर्च आणि ख्रिश्चन समाजावरील त्यांच्या अभ्यासपूर्ण ग्रंथांना विशेष मान्यता मिळाली. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांतील त्यांचे लेखन अत्यंत परखड आणि विचारप्रवर्तक होते. साप्ताहिक ‘विवेक’मध्ये त्यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले. साप्ताहिक विवेकच्या वतीने ‘कै. राजाभाऊ नेने स्मृती पुरस्कार’ देऊन नुकतेच त्यांना गौरविण्यात आले होते.

पत्रकारितेसोबतच २००३ मध्ये ते संघ परिवारातील ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’ या आयामाशी जोडले गेले. भारतीय मुस्लिम समाजात ‘राष्ट्र प्रथम’ हा भाव रुजविण्यासाठी या मंचाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय संयोजक म्हणून मोठी जबाबदारी सांभाळली.

अभ्यासू पत्रकार गमाविला : मुख्यमंत्री

ज्येष्ठ पत्रकार विराग पाचपोर यांच्या निधनाने आपण एक अभ्यासू पत्रकार आणि निष्ठावान स्वयंसेवक गमाविला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, विरागजींनी संघाचे प्रचारक म्हणून आसाममध्ये दीर्घकाळ कार्य केले. तेथेच त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर नागपुरातही पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांना नेहमीच वाचा फोडली. समर्पित, संवेदनशील, अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या विरागजींचे आपल्यातून अकस्मात निघून जाणे धक्कादायक आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande