४९ प्रकरणांतील खरेदी-विक्रीला स्थगिती द्या म्हाडाकडून राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांना पत्र
नाशिक, 18 जून (हिं.स.)। - बहुचर्चित म्हाडा घरकुल घोटाळ्याप्रकरणी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणात सरकारवाडा पोलीस ठाण्यात १९७बिल्डर व विकासक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
४९ प्रकरणांतील खरेदी-विक्रीला स्थगिती द्या म्हाडाकडून राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांना पत्र


नाशिक, 18 जून (हिं.स.)।

- बहुचर्चित म्हाडा घरकुल घोटाळ्याप्रकरणी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणात सरकारवाडा पोलीस ठाण्यात १९७बिल्डर व विकासक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर म्हाडाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांनी राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक कार्यालयाला पत्र पाठवून चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ४९ प्रकरणांतील खरेदी-विक्री व्यवहार थांबविण्याची मागणी केली आहे.

नाशिक महानगरपालिका हद्दीतील एक एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २० टक्के घरे राखीव ठेवण्याच्या नियमाला बगल देण्यासाठी काही बिल्डरांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. सातबारा उताऱ्यांचे कृत्रिम तुकडे पाडून सुमारे १५० कोटी रुपयांचा म्हाडा घरकुल घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची नियुक्ती केली आहे.

समितीकडून विविध विभागांतील कागदपत्रे आणि व्यवहारांची सखोल तपासणी सुरू आहे. म्हाडा, महसूल, महापालिका आणि भूमी अभिलेख विभागातील काही अधिकारी तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या संगनमतातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या घोटाळ्यामुळे सुमारे दीड हजार गरजू नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरांपासून वंचित राहावे लागल्याचे सांगितले जाते. विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर प्रकरणाला अधिकृत स्वरूप मिळाले. त्यानंतर भूमी अभिलेख विभाग आणि महापालिकेने कारवाई करत १०८ प्रकरणांपैकी अनियमितता आढळलेल्या ४९ प्रकरणांशी संबंधित बिल्डर्ससह १९७ जणांना नोटिसा बजावल्या. तसेच २६ ले आऊट कायमस्वरूपी रद्द करून संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande