
आगामी 22 जून रोजी होणार मतमोजणी
मुंबई, १८ जून (हिं.स.) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ११ जागांसाठी गुरुवारी झालेली मतदान प्रक्रिया दुपारी ४ वाजता शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राज्यभरातील बहुतांश मतदारसंघांत ९८ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली असून, अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का १०० च्या जवळ पोहोचल्याचे दिसून आले आहे.
या निवडणुकीत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी मतदार असल्यामुळे दरवेळेप्रमाणे यंदाही अत्यंत उच्चांकी मतदानाची नोंद झाली. निवडणूक आयोगाकडून सर्व 11 मतदारसंघांची अंतिम एकत्रित मतदान टक्केवारी जाहीर होणे अद्याप बाकी आहे.
छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात ९८.९० टक्के इतके विक्रमी मतदान नोंदविण्यात आले. नाशिक मतदारसंघात तब्बल ९९.८४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सांगली-सातारा मतदारसंघात दुपारी २ वाजेपर्यंत ८१.५६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानात मोठी वाढ होत दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ९५ च्या पुढे गेला. विशेष म्हणजे, माण आणि जत येथील मतदान केंद्रांवर शंभर टक्के मतदानाची नोंद झाली.
नांदेड मतदारसंघात दुपारी २ वाजेपर्यंत ८८.९४ टक्के मतदान झाले होते. अंतिम टप्प्यात हा आकडा ९८ टक्क्यांच्या पुढे गेला. नागपूर पोटनिवडणुकीतही ९९ टक्क्यांहून अधिक लोकप्रतिनिधींनी मतदान पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत निश्चित केली होती. राज्यभरातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या सर्व ११ जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवार, २२ जून २०२६ रोजी करण्यात येणार आहे. त्याच दिवशी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असून, विविध राजकीय पक्षांचे लक्ष या निकालांकडे लागले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी