नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ पोटनिवडणुकीत 98.44 टक्के मतदान
नागपूर 18 जून (हिं.स.) : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ पोटनिवडणुकीचे मतदान आज शांततापूर्ण व सुरळीत वातावरणात पार पडले. एकूण १४ मतदान केंद्रांवर ८३६ पैकी ८२३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून
मतदान लोगो


नागपूर 18 जून (हिं.स.) : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ पोटनिवडणुकीचे मतदान आज शांततापूर्ण व सुरळीत वातावरणात पार पडले. एकूण १४ मतदान केंद्रांवर ८३६ पैकी ८२३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून एकूण सुमारे ९८.४४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

या मतदारसंघात एकूण ४१९ पुरुष आणि ४१७ महिला असे मिळून ८३६ मतदार होते. मतदानादरम्यान १३ मतदारांनी आपला हक्क बजावला नाही. नागपूर शहरातून ११ तर उमरेड व कामठी येथून प्रत्येकी १ मतदाराने मतदान केले नाही.या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून राजीव पोतदार आणि इंडियन नॅशनल काँग्रेसकडून अतुल लोंढे हे दोन प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.निवडणुकीसाठी १४ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. विविध तहसील व नगरपरिषद कार्यालयांमध्ये संबंधित मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर, पारसिवनी, रामटेक, मौदा, कामठी, वानाडोंगरी आणि बुटीबोरी यांसह नागपूर शहर तहसील कार्यालयाचा समावेश होता.

कामठी तहसील कार्यालयात कामठी नगरपरिषद, विविध नगर पंचायती आणि कॅन्टोनमेंट बोर्ड क्षेत्रातील मतदारांनी मतदान केले. तर नागपूर शहर तहसील कार्यालयात महानगरपालिकेच्या मतदारांनी मतदान केले.

निवडणूक प्रक्रिया आणि वेळापत्रक

या पोटनिवडणुकीची अधिसूचना २५ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून, छाननी २ जून आणि अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून होती.

मतदान आज सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडले. मतमोजणी सोमवार, २२ जून रोजी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे होणार असून त्याच ठिकाणी स्ट्रॉंग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे.संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततापूर्ण व सुरळीत पार पडल्याने निवडणूक यंत्रणेने समाधान व्यक्त केले आहे. आता सर्वांचे लक्ष २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande