
सोलापूर, 18 जून (हिं.स.)।
मोहोळ वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अंतर्गत येत असलेल्या मौजे आळजापूर (ता. करमाळा) येथील राखीव वन क्षेत्रात वनविभागाने एक अत्यंत मोठी आणि धडक अतिक्रमण विरोधी कारवाई पार पाडली आहे. येथील राखीव वन गट क्रमांक १७६, १७७, १७८, १७९ व १८२ मधील सुमारे ७ हेक्टर (१७ पेक्षा जास्त एकर) शासकीय वन जमिनीवर करण्यात आलेले अनधिकृत अतिक्रमण वनविभागाने पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या संयुक्त मदतीने पूर्णपणे हटवून जमीन मोकळी केली आहे.मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, सदर राखीव वन क्षेत्रावर पारधी समाजातील काही व्यक्तींनी बेकायदेशीररित्या ताबा मिळवून त्या ठिकाणी २० झोपड्या उभारल्या होत्या. या संदर्भात वनविभागाने पूर्वतयारी करून अत्यंत गुप्ततेने व कडक पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवली. कारवाई दरम्यान शासकीय वन जमिनीवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या सर्व २० झोपड्या पाडण्यात आल्या.वन जमिनीवर बेकायदेशीररित्या अनधिकृत अतिक्रमण केल्याप्रकरणी घटनास्थळावरून १५ पुरुष आणि ४ महिला अशा एकूण १९ व्यक्तींना वनविभागाने ताब्यात घेऊन अटक केली. अटकेनंतर सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने गुन्याचे गांभीर्य विचारात घेऊन सर्व १९ आरोपींना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी वनरक्षक श्रीमती आयेशा पाशामियाँ शेख यांच्या फिर्यादीवरून मोहोळ वनपरिक्षेत्र कार्यालयात रॅ.गु.नं. ०५/२०२६ नुसार रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड