खालापूर येथे स्मार्ट मीटरविरोधात उबाठा सेनेचे आंदोलन
रायगड, 18 जून (हिं.स.) : राज्यभर सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत खालापूर येथील महावितरण कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन केले. स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य वीज ग्रा
No to Smart Meters: Shiv Sena (UBT) strongly opposes the move in Khalapur.


रायगड, 18 जून (हिं.स.) : राज्यभर सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत खालापूर येथील महावितरण कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन केले.

स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकार आणि महावितरण प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत ही प्रक्रिया तात्काळ थांबविण्याची मागणी केली.

ग्राहकांमध्ये स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढण्याची भीती निर्माण झाली असून, नागरिकांच्या शंकांचे निरसन न करता ही योजना राबविणे योग्य नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. तसेच ही योजना जनविरोधी असल्याचा आरोप करत सरकारवर खासगीकरणाला प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवण्यात आला.

दरम्यान, स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर रायगड जिल्हाभर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी दिला.

या आंदोलनामुळे खालापूर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुसरीकडे, महावितरणकडून स्मार्ट मीटर प्रणालीमुळे वीज वापर अधिक पारदर्शक होईल आणि ग्राहकांना रिअल-टाइम माहिती मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande