
बीड, 18 जून (हिं.स.)।
संसार करता करता प्रत्येकाने जीवनात परमार्थ केलाच पाहिजे. भक्ती ही मानवी जीवनात अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे, मात्र ती जर आपल्याकडून सातत्याने घडत असेल तर ते आपले परमभाग्य समजावे. संतांनी आपल्या साहित्यातून विश्वाला जीवनाचे खरे मर्म सांगितले आहे. भक्तीमार्गातून माणसाचे सर्व दुःख दूर होते आणि हाच अद्भुत अनुभव पंढरीच्या वारीतून येतो. पंढरीच्या वारीने मानवी जीवनात खरे सुख, समाधान आणि शांती मिळते, असे प्रतिपादन कीर्तनकार वर्षाताई काळे यांनी केले.
बीड शहरातील झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी वारीचे औचित्य साधून शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कीर्तन महोत्सवाचा प्रारंभ झाला आहे. बीड येथील कीर्तनकार वर्षाताई काळे यांच्या सुश्राव्य कीर्तनाने बीडकर भाविकांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी कीर्तनाचे निरूपण करताना त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरूपण केले. त्या म्हणाल्या की, मला एका पंढरीनाथाशिवाय जगात काहीही प्रिय नाही, त्या विठ्ठलाची कथा आणि त्याचेच कीर्तन मला मनापासून आवडते,
तेच श्रवण करणे कानाला गोड वाटते असे या अभंगातून संत तुकाराम महाराज सांगतात. पुढे त्या म्हणाल्या, ज्याला या भक्तीचा खरा जिव्हाळा कळला, त्याला जगातील इतर भौतिक गोष्टींचे अजिबात महत्त्व वाटत नाही. मनुष्य जन्माला येऊन संतांच्या पालखी सोहळ्यात आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी घडली पाहिजे. एका वर्षात आषाढी आणि कार्तिकी या दोन वाऱ्यांमधून भाविकाला थेट कुंभमेळ्याचे पुण्य मिळते. भक्तीमध्ये भक्ताचा भाव अत्यंत महत्त्वाचा असतो आणि जो खऱ्या भावाने भक्ती करतो, त्याच्या पाठीशी भगवंत कायम उभा राहतो. कलियुगात भगवंताचे नामसंकीर्तन घडणे हेच उद्धाराचे माध्यम आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis