
पुणे, 18 जून (हिं.स.)। कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नियोजनबद्ध वापर करण्यासाठी पुणे महापालिकेत स्वतंत्र सीएसआर कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
या उपक्रमासाठी आठ दिवसांत जागा उपलब्ध करून स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. मात्र, महापालिकेत यापूर्वीही अशाच प्रकारचा सीएसआर कक्ष कार्यरत होता. त्यामुळे नव्याने स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची आवश्यकता आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेने २०१७ मध्ये स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत स्वतंत्र सीएसआर कक्ष सुरू केला होता. या कक्षाच्या माध्यमातून महापालिकेच्या शाळा, आरोग्यसेवा आणि विविध सार्वजनिक प्रकल्पांसाठी कंपन्यांकडून सीएसआर निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. काही स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेत निधी उभारणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
शहरातील उद्योग, संस्था आणि दात्यांकडून मिळणाऱ्या निधीचे अधिक प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे. नवीन कक्ष कार्यान्वित झाल्यानंतर आरोग्य, शिक्षण, शाळा आणि इतर सार्वजनिक प्रकल्पांसाठी सीएसआर निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल, असा दावा करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु