
पुणे, 18 जून (हिं.स.)।जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि क्रांतिवीर लायन हार्टेड होनाजी भागुजी केंगले शासकीय औद्योगिक संस्था (आयटीआय) घोडेगाव (ता. आंबेगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने सदर आयटीआय येथे येत्या २४ जून रोजी सकाळी १० वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात आंबेगाव तालुक्यातील औद्योगिक परिसरातील १० उद्योजक सहभागी होणार असून, ३०५ हून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. फिटर, वेल्डर, टुल ॲन्ड डाय मेकर, शिट मेकर, मशिन ऑपरेटर, ग्रांइडर, क्वालिटी इंजिनिअर, क्वालिटी इन्स्पेक्टर, पॅकिंग तसेच ट्रेनी अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांच्या माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज करावा. तसेच २४ जून रोजी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती व बायोडाटा (रेझ्यूम) सोबत घेऊन मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु