विद्यार्थ्यांच्या यशात पालकांचे योगदान महत्त्वाचे - विजयराव जोशी
परभणी, 18 जून (हिं.स.)। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशामध्ये पालकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, पालकांच्या पाठबळामुळेच विद्यार्थी उच्च यश संपादन करू शकतात, असे प्रतिपादन नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजयराव जोशी यांनी केले. नूतन विद
विद्यार्थ्यांच्या यशात पालकांचे योगदान महत्त्वाचे - विजयराव जोशी


परभणी, 18 जून (हिं.स.)।

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशामध्ये पालकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, पालकांच्या पाठबळामुळेच विद्यार्थी उच्च यश संपादन करू शकतात, असे प्रतिपादन नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजयराव जोशी यांनी केले. नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार तथा स्मरणार्थ पारितोषिक वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणार्या 104 गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजयराव जोशी होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी (योजना) संजय ससाने उपस्थित होते. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष अनिल अष्टुरकर, सहसचिव तथा मुख्याध्यापक अनंत पांडे, संचालक व्यंकटेश तोरंबेकर आणि संस्थेच्या विविध संस्कार केंद्रांचे प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर धानोरकर व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने वातावरण भारावून गेले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक अनंत पांडे यांनी स्मरणार्थ पारितोषिक वितरण परंपरेचा इतिहास, उद्देश आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेने घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख अतिथी संजय ससाने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभ्यासातील यशाची गुरुकिल्ली उलगडून सांगितली. स्मार्ट वर्कचे महत्त्व, प्रभावी अध्ययन पद्धती आणि आनंददायी शिक्षणाची संकल्पना त्यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केली. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. अध्यक्षीय भाषणात विजयराव जोशी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना संस्था कोणताही भेदभाव न करता विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना सक्षम, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक बनविण्याचे कार्य संस्था सातत्याने करत असल्याचे त्यांनी नमूद केले. यंदा 104 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना घडविणार्या शिक्षकांचाही विशेष सन्मान करण्यात आला. श्रीपाद कुलकर्णी, सौ. गबाळे, देशपांडे, तुरुकमाने, नागरे, शिवराम कटारे आणि अमोल गोरकटे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावणारी कु. वैष्णवी बल्लाळे आणि द्वितीय क्रमांक प्राप्त करणारा चि. पियुष लासे यांचा स्मृतिचिन्ह, स्मरणार्थ पारितोषिक व पुष्पहार देऊन कुटुंबियांसमवेत विशेष सत्कार करण्यात आला. यंदा 99 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणार्या 4 विद्यार्थ्यांसह 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणार्या 34 विद्यार्थ्यांचा आणि 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणार्या एकूण 104 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande