
रत्नागिरी, 18 जून (हिं.स.) । केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच बी.ई. व बी. टेक.सह पदवीधर शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी देशातील नामांकित कंपन्यांमध्ये कामाचा थेट अनुभव घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे प्र. सहायक आयुक्त मो. ए. दुधाळ यांनी केले आहे.
जिल्ह्यातील विविध प्रमुख आस्थापना आणि उद्योगांमध्ये युवकांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने भारत पेट्रोलियम, नायरा एनर्जी लिमिटेड, तमिळनाड मर्कन्टाईल बँक, गेल इंडिया लिमिटेड, महिंद्रा ॲन्ड महिंद्रा, प्रेसिडेंट सिस्टम लिमिटेड, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड व इतर अनेक नामांकित कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे.
योजनेत १८ ते २५ वयोगटातील तरुण पात्र असेल. उमेदवार सध्या पूर्णवेळ शिक्षण, इतर कोणतेही व्यावसायिक कौशल्य किंवा नोकरीमध्ये नसलेला (भारतीय नागरिक) असावा. निवड झालेल्या तरुणांना ६ ते ९ महिन्यांचे थेट कंपनीत प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यांचे मोफत विमा संरक्षणही दिले जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी या योजनेतील सहभागासाठी केंद्र शासनाच्या http://pminternship.mca.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथे लॉगिन / रजिस्टर या टॅबवर क्लिक करून नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
ज्या उद्योजकांना किंवा कंपन्यांना या योजनेअंतर्गत आपल्या आस्थापनेत उमेदवार भरती करावयाचे आहेत, अशा सर्व उद्योजकांनी खालील पत्त्यावर किंवा संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आवार, नाचणे रोड, पोस्ट एमआयडीसी, रत्नागिरी. संपर्क समन्वयक : नितिश मुरकर (जिल्हा समन्वयक, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना), संपर्क क्रमांक - 7972914846, पांडुरंग कानडे - 8421241331.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी