प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर
अमरावती, 18 जून (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. या निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षजीत देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्
प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर


अमरावती, 18 जून (हिं.स.)।

स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. या निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षजीत देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांच्यात तिरंगी लढत होत आहे. जिल्ह्यातील सातही मतदान केंद्रांवर शांततेने मतदान सुरू असून प्रशासनानं कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

मतदान प्रक्रियेला प्रारंभ होताच भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी अमरावती तहसील कार्यालय तसेच भातकुली पंचायत समिती येथील मतदान केंद्रांना भेट दिली. यावेळी प्रवीण पोटे यांनी बोलताना विजयाचा विश्वास व्यक्त केला. यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. यंदाही मतदारांचे प्रेम आणि पाठबळ कायम असल्याने मी विजयी होईल असा विश्वास आहे, असं प्रवीण पोटे म्हणाले.

या निवडणुकीत भाजपाचे पारडे सुरुवातीपासूनच जड मानले जात आहे. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचार आणि मतदारांशी संपर्क टाळल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळं नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याचं देशमुख यांनी एका व्हिडिओद्वारे स्पष्ट केलं होतं. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत ते कुठेतरी मॅनेज झाले असल्याचा दावा केला होता. त्यानंतर काँग्रेसमधील अनेक स्थानिक प्रतिनिधींनी तटस्थ भूमिका जाहीर केली असली तरी काँग्रेसचे काही नगरसेवक मात्र मतदानासाठी अमरावती तहसील कार्यालय येथे सकाळीच पोहचले होते.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी निवडणुकीत काँग्रेसच्या मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, काँग्रेसने अधिकृत भूमिका स्पष्ट न केल्याने त्याचा कितपत फायदा वंचित उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना होणार याबाबत उत्सुकता आहे.

22 जूनला मतमोजणी -

मतदानासाठी जिल्ह्यात सात केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक केंद्रावर अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. 22 जून रोजी अमरावती शहरातील नियोजन भवन येथे मतमोजणी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande