
परभणी, 18 जून (हिं.स.)।
राष्ट्रीय परीक्षा संस्था मार्फत आयोजित करण्यात येणारी पुनर्नीट (RE-NEET-UG) 2026 परीक्षा दिनांक 21 जून 2026 (रविवार) रोजी दुपारी 02.00 ते 05.15 या वेळेत परभणी जिल्ह्यातील 14 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 4,751 परीक्षार्थी प्रविष्ट आले असून परीक्षार्थीना सकाळी 11.00 वाजल्यापासून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. परीक्षेचे सुरक्षित, पारदर्शक, सुरळीत व गैरप्रकारमुक्त वातावरणात आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे, असे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.
परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभाग प्रमुखांना राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सुरक्षा व्यवस्था - सर्व 14 परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुरुष व महिला पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. परीक्षार्थी व परीक्षा कर्मचाऱ्यांच्या सुरळीत हालचालीसाठी वाहतूक व्यवस्थापनाचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच त्वरित प्रतिसाद पथके व पोलीस गस्त पथके सतर्क ठेवण्यात आली आहेत.
राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या सूचनेनुसार प्रत्येक परीक्षा केंद्रासाठी दोन सशस्त्र केंद्रीय सशस्त्र पोलीस दल जवान नियुक्त करण्यात आले असून एकूण 28 सशस्त्र जवान कार्यरत राहतील. हे जवान गोपनीय परीक्षा साहित्य नियुक्त कस्टोडियन बँकेमधून परीक्षा केंद्रापर्यंत तसेच परीक्षा संपल्यानंतर संकलन केंद्रापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडतील.
गोपनीय परीक्षा साहित्य वाहतूक व्यवस्था - गोपनीय परीक्षा साहित्याच्या सुरक्षित वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रत्येक परीक्षा केंद्रासाठी एक वाहन उपलब्ध करून देण्यात आले असून एकूण 14 वाहने नियुक्त करण्यात आली आहेत. गोपनीय साहित्याची वाहतूक सुरक्षा यंत्रणांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे.
प्रशासकीय व्यवस्था - परीक्षेच्या प्रभावी समन्वयासाठी जिल्हा नोडल अधिकारी, सहाय्यक नोडल अधिकारी व सहाय्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रासाठी कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त करण्यात आले असून ते परीक्षा प्रक्रियेवर देखरेख ठेवतील.
आरोग्य, बीज व आपत्कालीन सेवा - परीक्षेच्या दिवशी आवश्यकतेनुसार वैद्यकीय पथके व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यात आला असून पर्यायी वीज व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अग्निसुरक्षा व आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश लागू - परीक्षेची पवित्रता व पारदर्शकता अबाधित राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), 2023 च्या कलम 163 अन्वये आदेश लागू करण्यात आले आहेत.
त्यानुसार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 08.00 ते सायंकाळी 07.00 या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स, इंटरनेट, फॅक्स व तत्सम सेवा केंद्रे बंद राहतील. तसेच परीक्षा केंद्र परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश व गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
परीक्षार्थी व पालकांना आवाहन -सर्व परीक्षार्थीनी राष्ट्रीय परीक्षा संस्थेने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे. प्रवेशपत्र, वैध ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रांसह नियोजित वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. पालकांनी परीक्षा केंद्र परिसरात अनावश्यक गर्दी टाळून प्रशासनास सहकार्य करावे.
पुनर्नीट (NEET-UG) 2026 परीक्षा सुरक्षित, सुरळीत, पारदर्शक व गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis