
पुणे, 18 जून (हिं.स.)।
जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला येत्या ३० जूनपासून सुरुवात होणार असून त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
या मोहिमेंतर्गत दिव्यांग, तृतीयपंथी आणि आदिवासी मतदारांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्याची भौगोलिक व्याप्ती लक्षात घेता आतापर्यंत सुमारे ५५ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.
दरम्यान, येत्या २० जूनपासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना एसआयआरच्या कामकाजाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्राधान्याने मतदान केंद्र प्रतिनिधींची नियुक्ती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले.
यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु