लातूर-धाराशिव-बीड विधान परिषद निवडणुकीत 99.49 टक्के विक्रमी मतदान
988 पैकी 983 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक केंद्रांवर शंभर टक्के मतदान लातूर, 18 जून (हिं.स.)। लातूर-धाराशिव-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतदानात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद
स्थानिक स्वराज्य संस्था


988 पैकी 983 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक केंद्रांवर शंभर टक्के मतदान

लातूर, 18 जून (हिं.स.)।

लातूर-धाराशिव-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतदानात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास शंभर टक्के मतदानाची नोंद केली. सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत झालेल्या मतदानात एकूण 988 मतदारांपैकी 983 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे या निवडणुकीत तब्बल 99.49 टक्के मतदान झाले.

उपलब्ध आकडेवारीनुसार, मतदारसंघात एकूण 492 महिला आणि 496 पुरुष असे 988 मतदार होते. त्यापैकी 490 महिला व 493 पुरुषांनी मतदान केले. महिला मतदारांची मतदानाची टक्केवारी 99.59 टक्के, तर पुरुष मतदारांची 99.40 टक्के इतकी नोंदविण्यात आली.

मतदानासाठी लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील विविध तहसील कार्यालये, पंचायत समिती कार्यालये आणि नगरपालिका कार्यालयांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. बहुतेक मतदान केंद्रांवर 100 टक्के मतदान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करून निवडणुकीबाबतची गंभीरता दाखवून दिली.

अहमदपूर येथील पंचायत समिती हॉल मतदान केंद्रावर एकूण 83 मतदारांपैकी 78 मतदारांनी मतदान केले. येथे मतदानाची टक्केवारी 94.32 टक्के राहिली. याशिवाय इतर बहुतांश केंद्रांवर शंभर टक्के मतदानाची नोंद झाली.

या मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बसवराज माधवराव पाटील मुरूमकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार महेश मोटे यांच्यात थेट लढत होत आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.

मतदानाची टक्केवारी पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविल्याचे स्पष्ट झाले असून आता सर्वांचे लक्ष मतमोजणी आणि निकालाकडे लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande