रत्नागिरी : गोळप परिसरातील सहा अंगणवाड्यांचे नूतनीकरण
रत्नागिरी, 18 जून (हिं.स.) : फिनोलेक्स कंपनीला ४५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून गोळप आणि फणसोप परिसरातील सहा अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले. ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित, प्रेरणादायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चांगले वातावरण मिळावे
रत्नागिरी : गोळप परिसरातील सहा अंगणवाड्यांचे नूतनीकरण


रत्नागिरी, 18 जून (हिं.स.) : फिनोलेक्स कंपनीला ४५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून गोळप आणि फणसोप परिसरातील सहा अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले.

ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित, प्रेरणादायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चांगले वातावरण मिळावे या उद्देशाने मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. रितू प्रकाश छाब्रिया आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन प्रकाश प्रल्हाद छाब्रिया यांच्या कल्पनेतून फिनोलेक्सच्या सीएसआर उपक्रमांतर्गत मुकुल माधव फाऊंडेशनद्वारे रत्नागिरी तालुक्यातील गोळप व फणसोप परिसरातील सहा अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले. या नूतनीकृत अंगणवाड्यांचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक परिसर, सुधारित पायाभूत सुविधा आणि बालमैत्रीपूर्ण वातावरणामुळे येथील बालकांच्या शिक्षण व सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांच्या नेतृत्वाखाली मुकुल माधव फाऊंडेशन शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून, समाजातील विविध घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. त्याच ध्येयाचा एक भाग म्हणून गोळप आणि फणसोप येथील अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले असून, स्थानिक समुदायाकडून या उपक्रमाचे विशेष स्वागत करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत गोळप गावातील रनपार, गुरववाडी, गोळप सडा आणि शिरंबाडवाडी तसेच फणसोप गावातील फणसोप (मराठी) आणि मागलाड येथील अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले. इमारतींची दुरुस्ती, बोलक्या भिंती, रंगकाम, स्वच्छतागृह सुविधा तसेच बालकांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

गोळप येथील अंगणवाड्यांच्या उद्घाटन कार्यक्रमास अतिथी म्हणून रत्नागिरी येथील अॅडव्होकेट, समाजसेविका व मुकुल माधव फाऊंडेशनच्या सल्लागार श्रीमती रुची महाजनी व अॅड. गौरव महाजनी उपस्थित होते. गोळपच्या सरपंच प्रियांका पंकज सुर्वे, उपसरपंच संदीप तोडणकर, उमंग साळवी (माजी सरपंच), कंत्राटदार सुयोग आंबेरकर व ओंकार भेकरे यांच्यासह मुकुल माधव फाऊंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी उपस्थित होते.

फणसोपच्या कार्यक्रमास युवा सेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी, समिती सदस्या अर्चना साळवी, सरपंच राधिका साळवी. माजी सरपंचगिरीराज साळवी, फणसोप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मनोज साळवी, ग्रामपंचायत सदस्य राकेश साळवी, मिलिंद कांबळे, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका व विद्यार्थी उपस्थित होते.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे रामबाबू सांका (डायरेक्टर – टेक्निकल), सागर चिवटे (फॅक्टरी मॅनेजर), नंदकिशोर शिंपी (प्लांट एचआर हेड), अमित घोरपडे (हेड – सिव्हिल), विकास कुरतडकर आणि आशिष आठवले, तर मुकुल माधव फाऊंडेशनकडून शुभम भेगडे, शामराव निंबाळकर आणि वरद गोरे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande