
बीड, 18 जून (हिं.स.)। प्रभू वैद्यनाथांच्या पवित्र भूमीत दगडगुंडे–पाटील–सेवलीकर परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची भक्तिमय वातावरणात मंगलमय सांगता संपन्न झाली.
गणेशपार येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, मनोहरपंत बडवे सभागृहात आयोजित या आध्यात्मिक सोहळ्याने भाविकांना भक्ती, ज्ञान आणि संस्कारांचा अमूल्य ठेवा प्रदान केला. कथा समाप्ती प्रसंगी परळी वैजनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते श्रीमद् भागवत महापुराणाची आरती करण्यात आली.
यावेळी उपस्थित भाविकांनी जय जय राम कृष्ण हरी आणि पांडुरंग विठ्ठल नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या ज्ञानयज्ञात सुप्रसिद्ध भागवत कथाकार, भागवत मर्मज्ञ ह.भ.प. श्री बाळू महाराज उखळीकर यांच्या सुमधुर, ओजस्वी आणि दिव्य वाणीतून श्रीमद् भागवत कथेचे रसाळ निरूपण श्रवण करण्याचा परम भाग्ययोग लाभला. त्यांच्या प्रवचनातून भक्ती, वैराग्य, सदाचार, कुटुंबमूल्ये आणि मानवतेचा संदेश भाविकांच्या हृदयापर्यंत पोहोचला.
अधिक मासाच्या या पुण्यकालात पार पडलेल्या श्रीमद् भागवत कथेचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच असंख्य भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थिती दर्शविली. सात दिवस भक्ती, नामस्मरण, हरिकीर्तन आणि भागवत श्रवणाच्या माध्यमातून अध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव सर्वांनी घेतला.
दगडगुंडे–पाटील–सेवलीकर परिवाराने आयोजित केलेल्या या पवित्र उपक्रमाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार. अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजात संस्कार, एकात्मता आणि अध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन होत असते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis