छ. संभाजीनगर येथे 20 जून रोजी ग्रामपंचायत कर्मचार्यांचे राज्यस्तरीय महाअधिवेशन
परभणी, 18 जून (हिं.स.)। महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन संघटनेच्या वतीने 20 जून 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील लाडगाव परिसरातील आदिती लॉन्स येथे राज्यस्त
छ. संभाजीनगर येथे 20 जून रोजी ग्रामपंचायत कर्मचार्यांचे राज्यस्तरीय महाअधिवेशन


परभणी, 18 जून (हिं.स.)। महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन संघटनेच्या वतीने 20 जून 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील लाडगाव परिसरातील आदिती लॉन्स येथे राज्यस्तरीय भव्य महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनात राज्यातील सुमारे 60 हजार ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण होंडे पाटील यांनी दिली.

या महाअधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच माजी राज्यमंत्री, आमदार व युनियनचे राज्याध्यक्ष बच्चू कडू यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. संघटनेचे संस्थापक तथा राज्य सरचिटणीस गिरीश दाभाडकर आणि कार्याध्यक्ष काझी अल्लाउद्दीन यांचे मार्गदर्शनही अधिवेशनात लाभणार आहे. अधिवेशनामध्ये ग्रामपंचायत कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करणे, पेन्शन योजना लागू करणे, 10 टक्के आरक्षणानुसार भरती प्रक्रिया नियमित राबविणे, वेतन नियमितपणे अदा करणे तसेच वेतनासाठी असलेली उत्पन्नाची अट शिथिल करणे यांसह विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. परभणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचार्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मागण्यांसाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नारायण होंडे पाटील यांनी केले आहे. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी परभणी तालुका अध्यक्ष लक्ष्मण खरवटे, मानवत तालुका अध्यक्ष विठ्ठल कदम, जिंतूर तालुका अध्यक्ष अंकुशराव जाधव यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande