
ठाणे, 18 जून (हिं.स.)। मान्सून काळात पशुधनामध्ये संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने ठाणे जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत व्यापक लसीकरण व पूर्वतयारीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पशुधनाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक लससाठा, पशुवैद्यकीय यंत्रणा आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार ठाणे जिल्ह्यात ठाणे, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये एकूण ६८ पशुवैद्यकीय संस्था कार्यरत आहेत. यामध्ये १ जिल्हा पशुवैद्यकीय दवाखाना, ४ तालुका मोबाइल पशुवैद्यकीय पथके आणि ६४ पशुवैद्यकीय दवाखान्यांचा समावेश आहे.
मान्सूनपूर्व लसीकरण मोहिमेसाठी जून २०२६ अखेरपर्यंत विविध रोगप्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यात ब्लॅक क्वार्टर (BQ), हेमोरॅजिक सेप्टीसीमिया (HS), एंटरोटॉक्सिमिया (ETV), राणीखेत (RD), फाऊल पॉक्स (FP), लसोटा, क्लासिकल स्वाइन फीव्हर (CSF), रेबीज (ARV) यांसह विविध लसींचा वापर करण्यात येत आहे. पशुधनामध्ये रोगांचा प्रसार रोखण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यात सध्या एकूण १ लाख ४७ हजार ६९५ पशुधन असून त्यामध्ये १ लाख १० हजार ७७१ मोठी जनावरे आणि ३६ हजार ९२४ लहान जनावरांचा समावेश आहे. शहापूर, मुरबाड आणि भिवंडी तालुक्यांमध्ये पशुधनाची संख्या अधिक असल्याने त्या भागांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार प्रत्येक तालुक्यात सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यासाठी आवश्यक PPE किट उपलब्ध करून देण्यात आले असून पशुधनाशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी २४x७ आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक ८७६६४२१६४७ कार्यान्वित करण्यात आला आहे.
पशुधनामध्ये रोगराईचा प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांनी वेळेत लसीकरण करून घ्यावे, जनावरांच्या निवाऱ्याची स्वच्छता राखावी तसेच कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
मान्सून काळात पशुधनाचे आरोग्य सुरक्षित राखणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय यंत्रणा, लसींचा साठा आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. पशुपालकांनी लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या पशुधनाचे संरक्षण करावे. रोगप्रतिबंधक उपाययोजनांमुळे पशुधनाचे आरोग्य, दुग्धोत्पादन आणि पशुपालकांचे आर्थिक हित अबाधित राहण्यास मदत होईल, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वल्लभ जोशी यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर