सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भोजनगृहाचा अन्न परवाना निलंबित
पुणे, 18 जून (हिं.स.) : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभागाकडून अन्नसुरक्षेबाबत कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. नागरिकांच्या तक्रारींसाठी सुरू करण्यात आलेल्या टोल-फ्री क्रमांकावर मोठ्या प्रमाणात तक्रारी प्र
fda


पुणे, 18 जून (हिं.स.) : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभागाकडून अन्नसुरक्षेबाबत कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. नागरिकांच्या तक्रारींसाठी सुरू करण्यात आलेल्या टोल-फ्री क्रमांकावर मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असून त्यांची पडताळणी करून तत्काळ कारवाई केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मध्यवर्ती भोजनगृहाचे संचालन करणाऱ्या ‘मे. श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेस’ या संस्थेचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला आहे.

अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी 16 जून रोजी भोजनगृहाची अचानक तपासणी केली असता अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे तसेच अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तपासणी अहवालाच्या आधारे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

अन्नसुरक्षेच्या नियमांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने या कारवाईद्वारे दिला आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तत्परतेने कार्यवाही करण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून आगामी काळात अशा प्रकारच्या कारवायांचा धडाका आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande