
रत्नागिरी, 18 जून (हिं.स.) । मालघर (ता. चिपळूण) येथील टेपवाडी परिसरातील सुमारे दहा फूट खोल आणि पाणी नसलेल्या पडीक विहिरीत पडलेल्या दोन मगरींची वन विभागाच्या बचाव पथकाने सुटका केली. या बचावकार्यानंतर दोन्ही मगरींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
मालघर येथील रहिवासी प्रकाश लटके यांना विहिरीत दोन मगरी पडल्याचे आढळून आले. त्यांनी वन विभागाचे कर्मचारी तथा वनरक्षक राहुल गुंठे यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच चिपळूण वन परिमंडळाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.
ही विहीर मालघर धरणालगत असल्याने या मगरी धरण परिसरातून बाहेर पडून विहिरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वन कर्मचाऱ्यांनी शिडीच्या साहाय्याने विहिरीत उतरून पाहणी केली असता, त्यातील एक मगर सुमारे नऊ फूट तर दुसरी सात फूट लांबीची असल्याचे निदर्शनास आले.
अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत वन विभागाच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मगरींना एकामागोमाग सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दोन्ही मगरी सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
हे बचावकार्य विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वन संरक्षक प्रियंका लगड आणि वन परिक्षेत्र अधिकारी जितेंद्र गुजले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. मोहिमेत वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहुल गुंठे, कृष्णा इरमले, दत्ताराम सुर्वे, अजय बडदे तसेच वाहन चालक नंदकुमार कदम यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. याशिवाय प्रकाश लटके आणि टेपवाडीतील ग्रामस्थांनीही बचावकार्यात मोलाचे सहकार्य केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी