
परभणी, 18 जून (हिं.स.)।
येथील रेल्वेस्थानकावर एक सामान्य द्वितीय श्रेणी डबा जीएस क्रमांक ०३७४३५ वेगळा झाल्याचे आणि दुसरा डबा गार्ड-कम-लगेज व्हॅन एससी क्रमांक ०११०३७ वर चढल्याची घटना पूर्णा स्थानक यार्डमध्ये मास्ट क्रमांक ३१९/१२५२-१२५६ जवळ घडली. आपत्कालीन परिस्थितीनुसार अपघात निवारण रेल्वेगाडी, स्वयंचलित वैद्यकीय मदत वाहन, अग्निशमन दल, एनडीआरएफ, सिव्हिल डिफेन्स, रेल्वे वैद्यकीय पथके आणि रेल्वे सुरक्षा बल यांना तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. या घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नाही. घटनेवेळी उपस्थित प्रवाशी सैरावैरा झाले. मात्र काहीच वेळात ही रेल्वेची मॉक ड्रील असल्याचे लक्षात आले. आणी प्रवाशांचा जीव एकदाचा भांड्यात पडला.या मॉक ड्रीलसाठी उन्हाळी विशेष एक्स्प्रेस गाडी क्रमांक ००००१ ला अपघात झाल्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली. रेल्वे आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमधील समन्वय व सज्जतेची चाचणी घेण्यासाठी पूर्णा रेल्वे स्थानक यार्ड येथे वरिष्ठ रेल्वे अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर रेल्वे अपघाताचे अनुकरण करणारी सर्वसमावेशक मॉक ड्रिल यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली. मुख्यालयातून मुरली कृष्णा, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी तथा प्रधान मुख्य सिग्नल व दूरसंचार अभियंता, धर्मेंद्र कुमार, मुख्य यांत्रिक अभियंता (नियोजन), मुथुस्वामी, उपमुख्य यांत्रिक अभियंता/डिझेल, किशोर, उपमुख्य सुरक्षा अधिकारी/यांत्रिक तसेच वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी/चीफ लगद/सिकंदराबाद यांनी या सरावात सहभाग घेतला. नांदेड विभागाकडून विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक कल्याण राजू तसेच सुरक्षा, अभियांत्रिकी, संरक्षा, वैद्यकीय, विद्युत, ट्रॅक्शन, सिग्नल, परिचालन, यांत्रिक, वाणिज्य आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या मॉक ड्रिलदरम्यान १४ स्काऊट अँड गाईड स्वयंसेवक आणि १५ रेल्वे कर्मचाऱ्यांनी जखमी प्रवाशांची भूमिका साकारली. सूचना मिळाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. एनडीआरएफ, एआरटी आणि बचाव पथकांनी तात्काळ डब्यांच्या खिडक्या व छताचे भाग कापून अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्याचे कार्य सुरू केले. एनडीआरएफ, सिव्हिल डिफेन्स, वैद्यकीय पथक, आरपीएफ कर्मचारी आणि स्काऊट अँड गाईड स्वयंसेवक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सर्व २९ अनुकरणात्मक जखमी प्रवाशांची यशस्वी सुटका करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांवर रेल्वे व राज्य शासनाच्या वैद्यकीय पथकांनी प्रथमोपचार केले आणि सरावाचा भाग म्हणून त्यांना राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेत आणखी सुधारणा करण्यासाठी सर्व सहभागी संस्थांनी संयुक्त निरीक्षणे नोंदविली.याचवेळी अपघात निवारण रेल्वेगाडीच्या कर्मचाऱ्यांनी १४० टन क्षमतेच्या क्रेन आणि विशेष एआरटी उपकरणांच्या सहाय्याने पुनर्स्थापना कार्य केले. त्यामुळे रेल्वे पथकांची कमीत कमी वेळेत रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याची क्षमता प्रभावीपणे प्रदर्शित झाली. एनडीआरएफ अधिकाऱ्यांनी, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी तसेच प्रधान मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी सरावापूर्वी आणि सरावानंतर सविस्तर मार्गदर्शन व आढावा बैठक घेतली. संपूर्ण मॉक ड्रिलवर वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी यांनी बारकाईने लक्ष ठेवून सर्व उपक्रमांचे समन्वयन केले तसेच सहभागी पथकांच्या कामगिरीचा आढावा घेतला.या मॉक ड्रिलमध्ये विविध विभागांतील सुमारे १६० रेल्वे कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या सरावाद्वारे रेल्वे प्रशासन व संबंधित यंत्रणांची रेल्वे अपघात व्यवस्थापन, बचाव कार्य, वैद्यकीय स्थलांतरण आणि आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे वाहतूक पुनर्स्थापना याबाबतची सज्जता, समन्वय आणि त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता यशस्वीपणे प्रदर्शित झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis