
लातूर, 18 जून (हिं.स.) : विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील संत गोरोबा सोसायटी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर येथे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र क्रमांक 15 ची सुरुवात करण्यात आली आहे.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्वेंटीवन ॲग्री लि.च्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या पुढाकारातून हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
शहरी भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. फाउंडेशनच्या वतीने महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन आर्थिक स्वावलंबनाची दिशा देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.
या नवीन प्रशिक्षण केंद्रामध्ये एकूण 83 महिलांनी सहभाग नोंदवला आहे. प्रशिक्षणादरम्यान महिलांना शिलाई व शिवणकामाच्या विविध तंत्रांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.
केंद्राचे उद्घाटन संस्थेच्या विभाग प्रमुख संगीता मोळवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभाग नगरसेवक विकास कांबळे, सोशल मीडिया प्रमुख प्रवीण सूर्यवंशी, ट्रेनर प्रेमा ठाकूर, संस्थेचे समन्वयक गजानन बोयणे आणि सोशल प्लॅनर सोमनाथ कावळे उपस्थित होते.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis