
लातूर, 18 जून (हिं.स.)। विधानपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडली. या निवडणुकीच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या सर्व लोकप्रतिनिधी मतदारांचे राज्याचे माजी मंत्री तथा स्थानिक आमदार संजय बनसोडे यांनी गुलाबपुष्प देऊन अत्यंत उत्साहात स्वागत केले.
लोकप्रतिनिधींचा आगळावेगळा सन्मान
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरसेवक आणि इतर विविध स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी हे मतदार असतात. आज मतदानाच्या दिवशी सकाळी मतदान केंद्रावर पोहोचणाऱ्या या सर्व लोकप्रतिनिधींचे आमदार संजय बनसोडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन, गुलाबपुष्प देत स्वागत केले. मतदारांचा अशा प्रकारे सन्मान केल्यामुळे मतदान केंद्राच्या परिसरात अत्यंत सलोख्याचे आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले.
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांचे मानले आभार!
याप्रसंगी बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांचे हे प्रतिनिधी लोकशाहीचा मुख्य कणा आहेत. आज त्यांनी आपल्या अमूल्य मताचा अधिकार बजावून लोकशाहीची प्रक्रिया अधिक गतिमान आणि बळकट केली आहे. सक्रिय सहभाग नोंदवत मतदानाचा पवित्र हक्क बजावल्याबद्दल त्यांनी सर्व मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व आभार मानले.यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis