बीडने गमावला सक्षम अधिकारी; विकासाला धक्का – सारिका क्षीरसागर
बीड, 18 जून (हिं.स.) : बीड नगरपरिषदेतील सत्ताधारी गटांतील अंतर्गत वाद आणि गटबाजीमुळे शहराला एक सक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी गमवावा लागल्याचा गंभीर आरोप भाजपच्या गटनेत्या तथा नगरसेविका सारिका क्षीरसागर यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना क्षी
बीडने गमावला सक्षम अधिकारी; विकासाला धक्का – सारिका क्षीरसागर


बीड, 18 जून (हिं.स.) : बीड नगरपरिषदेतील सत्ताधारी गटांतील अंतर्गत वाद आणि गटबाजीमुळे शहराला एक सक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी गमवावा लागल्याचा गंभीर आरोप भाजपच्या गटनेत्या तथा नगरसेविका सारिका क्षीरसागर यांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना क्षीरसागर म्हणाल्या की, नगरपरिषदेत सत्ताधारी नगरसेवकांमध्ये तीन ते चार गट निर्माण झाले असून प्रत्येक जण स्वतःला नगराध्यक्ष समजून वागत आहे. या गटबाजीमुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर विविध स्तरांतून सतत दबाव टाकला जात होता.

त्या पुढे म्हणाल्या की, सभागृहात हा विषय चर्चेला आल्यानंतर त्यांनी आणि भाजपच्या इतर नगरसेवकांनी नेहमीच अधिकाऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली. सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत मतभेद प्रशासनावर लादू नयेत आणि अधिकाऱ्यांना दबावाखाली काम करण्यास भाग पाडू नये, अशी भूमिका भाजपने सुरुवातीपासूनच मांडली होती. मात्र, या भूमिकेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

क्षीरसागर यांच्या मते, या परिस्थितीमुळे प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारा एक कार्यक्षम अधिकारी बीडला गमवावा लागला. त्यांच्या बदलीमुळे शहराच्या विकास प्रक्रियेला मोठा धक्का बसला असून अनेक महत्त्वाच्या विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त होतील, मात्र त्यांना बीड शहराची परिस्थिती, स्थानिक गरजा आणि प्रलंबित प्रश्न समजून घेण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने आवश्यक निर्णय आणि विकासकामांमध्ये विलंब होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

बीड शहराच्या हितापेक्षा सत्ताधाऱ्यांनी गटबाजीला प्राधान्य दिल्याने शहराला हा मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाल्याचे मत सारिका क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande