
रत्नागिरी, 18 जून (हिं.स.) । जिल्ह्यात काही शहरांमध्ये सुमारे महिनाभर पुरेल, एवढाच पाणीसाठा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाऊस लांबल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणीटंचाई नियोजनाबाबत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीच ही माहिती देण्यात आली.
जिल्हाधिकारी म्हणाले, निसर्गाने समृद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या काही गावांमध्ये निर्माण झालेली पाण्याची परिस्थिती तात्पुरती आहे. पावसाचे आगमन लांबल्यामुळे सद्यःस्थितीत उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी विहिरी, विंधन विहिरी आणि नळाच्या पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. पाणी बचतीचा हा निर्णय प्रशासनाला सहकार्य म्हणून प्रत्येक नागरिकाने पाळावा.
बैठकीत जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध साठा, इतर स्रोतांमधील पाणीसाठा आणि आवश्यक पाणीपुरवठा याबाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात सध्या काही शहरांसाठी पुढील २५ ते ३० दिवस पुरेल इतकाच पिण्याचा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी संबंधित पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
नगरपालिका, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीने आपापल्या क्षेत्रातील गावांचे सर्वेक्षण करावे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उपलब्ध स्रोत आणि टँकरने करावा लागणारा पुरवठा याबाबतचा अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
टंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे नियोजन करा, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, रिसॉर्ट्स आणि होम स्टे यांचे जलतरण तलाव (स्विमिंग पूल) असतील, तर त्यांचा नॉन-फूड रिलेटिव्ह पाणीपुरवठा त्वरित थांबवावा. लोटे एमआयडीसी परिसरातील नागरिक आणि बाहेरून आलेल्या कामगारांच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन एमआयडीसी असोसिएशनने आपली मागणी कार्यालयाकडे नोंदवावी, जेणेकरून त्याचे योग्य नियोजन करता येईल.
सार्वजनिक पाणीस्रोतांच्या ५०० मीटर परिसरामध्ये असणारे इतर पाण्याचे स्रोत किती आहेत, याची माहिती जलआराखड्यात समाविष्ट करण्याची सूचनाही आज देण्यात आली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेचा आढावा घेऊन टंचाईग्रस्त गावांमधील पाणीपुरवठ्याबाबत आढावा घ्यावा. त्याबाबतची मागणी कळवावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता अनिरुद्ध जोशी, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, मुख्याधिकारी वैभव गारवे, फेडरेशन ऑफ रत्नागिरी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राज आंब्रे, संचालक शिरीष चौधरी, राजेश तिवारी आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि पालिकांचे मुख्याधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी