
ठाणे, 18 जून (हिं.स.)। ठाणे शहरातील अनेक हॉटेलांमध्ये बेकायदेशीर पद्धतीने पोटमाळे उभारले असून, त्याखाली किचन थाटण्यात आली आहेत. अशा धोकादायक हॉटेलांमध्ये कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते, अशी भीती भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केली. काही हॉटेलांप्रमाणे बेसमेंटमध्येही आगीचा धोका असल्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन अग्निशमन विभागाने ना हरकत परवाना (एनओसी) द्यावा, अशी मागणी नारायण पवार यांनी केली.
गावदेवी मंडईतील आगीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या महासभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर नारायण पवार यांनी ही मागणी केली. शहरातील तलावपाळी येथे २५ वर्षांपूर्वी लेक व्ह्यू हॉटेलला आग लागून पोटमाळ्यावरील ग्राहकांचा मृत्यू झाला होता. त्याच पद्धतीने ठाण्यात अनेक हॉटेल सुरू आहेत. महापालिका व अग्निशमन दलाच्या नियमांना तिलांजलि देत अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये पोटमाळे उभारले आहेत. अनेक ठिकाणी बेसमेंटमध्ये बेकायदा कार्यालये सुरू आहेत. या ठिकाणांना अग्निशमन दलाकडून कार्यालयातून ना हरकत परवाने दिले जातात. यापुढील काळात दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणीनंतर परवानगी द्यावी, अशी मागणी नारायण पवार यांनी केली.
शहरातील अनेक भागात आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी जाण्यासाठीही पुरेशी जागा नाही. त्यामुळे ठिकठिकाणच्या अतिक्रमणांवर कारवाई करावी. हिरानंदानी इस्टेटमधील काही इमारतींमध्ये रिफ्यूजी एरिया बंद करून वापर सुरू आहे. अग्निशमन दलाची रखडलेली भरती तातडीने करावी, अशा मागण्या नगरसेवक नारायण पवार यांनी केल्या. त्याचबरोबर अग्निशमन दलासाठी घेतलेल्या अनेक बुलेट मोटारसायकल गोदामात पडून असल्याकडे लक्ष वेधले.
महापालिका मुख्यालयातील शहर विकास विभागाला दोन ते तीन वेळा नेमकी आग कशी लागते, असा सवाल नारायण पवार यांनी केला. तसेच या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर