
रायगड, 18 जून (हिं.स.)। विविध सामाजिक प्रश्नांवर आंदोलन, उपोषण आणि जनजागृती मोहिमा राबविणारे विजय हजारे यांच्याबाबत एक छायाचित्र मध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करत असल्याचा दावा या छायाचित्रासंदर्भात केला जात असून, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय हजारे हे विविध अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि नागरिकांच्या समस्यांविरोधात वेळोवेळी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेत असतात. सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेणारे हजारे हे अनेकांसाठी सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या एका छायाचित्रात ते रस्त्यालगतच्या सार्वजनिक ठिकाणी बसलेले दिसत असून धूम्रपान करत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे हे कायद्याने दंडनीय कृत्य मानले जाते. त्यामुळे कायद्याचे पालन करण्याचा संदेश देणाऱ्या व्यक्तींनी स्वतःही नियमांचे पालन करणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली. “सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्यांनी स्वतःच्या वर्तनातून आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे,” असे मत स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, केवळ एका छायाचित्राच्या आधारे अंतिम निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचेही काही नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित छायाचित्रातील परिस्थिती, वेळ आणि वस्तुस्थिती याबाबत विजय हजारे यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे यासंदर्भात त्यांचे स्पष्टीकरण मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तींनी कायद्याचे काटेकोर पालन करून समाजासमोर आदर्श निर्माण करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)